बागलांना थोडी जरी असेल तर त्यांनी आधी शेतकरी, कामगार यांची देणी देऊन परत निवडणुकीला सामोरे जावे- दशरथआण्णा कांबळे
बागलांना थोडी जरी असेल तर त्यांनी आधी शेतकरी, कामगार यांची देणी देऊन परत निवडणुकीला सामोरे जावे- दशरथआण्णा कांबळे
करमाळा-प्रतिनिधी
करमाळा तालुक्यामध्ये सहकार क्षेत्राचे दोन कारखाने आहेत. एक आदिनाथ सहकारी साखर कारखाना व दुसरा मकाई सहकारी साखर कारखाना आणि दुर्दैवाने या दोन्ही कारखान्यांवर बागल घराण्याचीच सत्ता आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने दिग्विजय बागल व सौ. रश्मी बागल-कोलते यांच्याकडे दोन्ही कारखान्याची धुरा सांभाळण्यासाठी दिली होती. या दोन्ही भावंडांनी स्वतःचा फायदा करुन घेत असताना, एक ना अनेक संकटे दोन्ही कारखान्यातील कामगार, ऊस उत्पादक शेतकरी यांच्यापुढे निर्माण करुन ठेवले आहेत. अशातच मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. व प्रत्येकजण आता शेतकऱ्यांचा, कामगारांचा कळवळा घेऊन निवडणुक लढविण्याची भाषा करत आहे. परंतु या निवडणुकीच्या आधीपासुन शेतकरी, कामगार यांचे प्रश्न आ वासुन उभे होते. मग आता निवडणुकीच्या अनुषंगाने मकाईचे बागलांनी वाटोळे केले, पगारी दिल्या निहीत, साखर शिल्लक नाही. असे म्हणणारे मागील काही वर्षे का गप्प होते. आम्ही आदिनाथ कारखान्यातील कामगारांच्या पगारासाठी रास्ता रोको, मोर्चे, भीक मागो आंदोलन, तिरडी मोर्चा, करमाळा बंद साखर आयुक्तालयासमोर आंदोलने अशा विविध माध्यमातुन पिडीत असणाऱ्या शेतकरी कामगारांसाठी लढा देत राहिलो. व त्याला काहीअंशी यश देखील आले. मग आताचे जे कावळे काव काव करत आहेत. त्यांना त्यावेळेस का कामगार आणि शेतकऱ्यांना पाठिंबा देऊ वाटला नाही. हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे. असे कांबळे यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना कांबळे म्हणाले कि, मकाईची निवडणुक लागली खरी, परंतु येथील कामगार आणि शेतकऱ्यांची देणी बागलांनी लवकरात-लवकर द्यावीत. कारण प्रत्येकाच्या घरी काही ना काही शुभकार्ये आहेत. आणि अशा वेळेस शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात उभे करण्याचे पाप बागल करत आहेत. दोन्ही कारखान्याच्या माध्यमातुन बागलांनी लुबाडून मोठ्या प्रमाणात जी काही मोह-माया जमा केली आहे. ती आता विकून शेतकरी आणि कामगारांची देणी द्यावीत. मकाई सहकारी साखर कारखाना ज्यावेळी सुरु झाला. त्यावेळी स्व. दिगंबरराव बागल मामा यांनी योग्य नियोजन करुन, कारखान्याच्या चांगल्या साखर उत्पादकतेमुळे पुरस्कार सुध्दा मिळविले. परंतु स्व. मामांच्या नंतर दोन्ही भावा-बहिणीनी स्वार्थाने ग्रसित होऊन, दोन्ही कारखान्याची पुरती वाट लावून अनेक समस्या निर्माण करुन ठेवल्या आहेत. या दोन्ही भावा-बहिणीचा असला कारभार पाहुन स्व. मामा सुध्दा त्यांच्या कपाळाला हात लावून बसले असतील. तसेच शेतकरी कामगार संघर्ष समितीच्या माध्यमातुन आम्ही केलेल्या आंदोलनाचे फलित म्हणुन सहकार कोर्टामध्ये, आदिनाथ कारखान्यातील MSC बँकेने साखर विकुन चार कोटी रुपये जमा केले आहेत. परंतु कोर्टामध्ये कामगारांचे हजेरी पत्रक आणि पगार पत्रक या स्वार्थी लोकांनी जमा न केल्यामुळे, ते कामगारांच्या हक्काचे पैसे अद्यापपर्यंत तसेच कोर्टामध्ये पडून आहेत. तरी बागलांना थोडी जरी लाज असेल तर आधी कामगार आणि शेतकऱ्यांची देणी द्यावीत आणि परतच निवडणुकीला सामोरे जावे. अशा प्रकारे शेतकरी कामगार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष दशरथआण्णा कांबळे यांनी टोला लगावला आहे.