2515 च्या 1 कोटी निधी मंजूर असलेल्या कामावरील स्थगिती उठविली. आ. संजयमामा शिंदे
2515 च्या 1 कोटी निधी मंजूर असलेल्या कामावरील स्थगिती उठविली.
आ. संजयमामा शिंदे यांची माहिती.
प्रतिनिधी हर्षवर्धन गाडे
25 15 योजनेअंतर्गत करमाळा तालुक्यामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात 5 कोटी रुपये निधीची कामे मंजूर केलेली होती .सदर कामांपैकी 95 लक्ष निधी मंजूर असलेली कामे दिनांक 12 ऑक्टोबर 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये रद्द झालेली होती. सदर कामे रद्द यादीतून वगळण्यात आल्याचा शासन अध्यादेश 24 ऑगस्ट 2023 रोजी निघालेला असून तालुक्यातील 95 लक्ष निधी मंजूर असलेली कामे होण्याचा मार्ग आता सुकर झाला असल्याची माहिती आ. संजयमामा शिंदे यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये मंजूर असलेली कामांच्या निविदा निघालेल्या नव्हत्या अशी 95 लक्ष निधीची कामे ऑक्टोबर 2022 मध्ये रद्द ठरविण्यात आली होती तो रद्द आदेश आता मागे घेतलेला असून सदर कामे 31 मार्च 2024 पर्यंत पूर्ण व्हावी असा आदेश निघालेला आहे .सदर निधीमधून मौजे घरतवाडी, कुंभारगाव, सावडी, आळजापूर, लव्हे, वांगी नं.1, वांगी नं.2, वांगी नं. 3 ,वांगी नं.4, पांगरे, सांगवी नं.2, कोळगाव, घोटी, सालसे, आवाटी, देवीचा माळ, कोंढार चिंचोली, कंदर व सातोली या 19 गावांमध्ये सामाजिक सभागृह ,गावांतर्गत व वाडीवस्तीवरील रस्ते मुरूमीकरण करणे ,गटर्स व इतर सोयी सुविधा पुरविणे आदी कामांसाठी प्रत्येकी 5 लक्ष याप्रमाणे निधी वितरित केला जाणार आहे. तरी संबंधित ग्रामपंचायतींनी ही कामे 31 मार्च 2024 पर्यंत पूर्ण करावीत असे आवाहन आमदार संजयमामा शिंदे यांनी केले आहे .
लवकरच 65 कोटी निधी मंजुरीचे आदेश येणार...
करमाळा मतदार संघाच्या भरीव विकासासाठी 25 15 योजनेतून 50 कोटी, वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगरपरिषद विकासासाठी 10 कोटी व समाज कल्याण विभागाकडून 5 कोटी असे 65 कोटी निधी मंजुरीचे शासन अध्यादेश लवकरच निघतील अशी माहिती आ. शिंदे यांनी दिली.