महावितरण कर्मचाऱ्यांनी बुधवारी खंडीत झालेला वीजपुरवठा सुरुळीत करण्यासाठी केलेले प्रयत्न खरेच कौतुकास्पद, दशरथआण्णा कांबळे
महावितरण कर्मचाऱ्यांनी बुधवारी खंडीत झालेला वीजपुरवठा सुरुळीत करण्यासाठी केलेले प्रयत्न खरेच कौतुकास्पद, दशरथआण्णा कांबळे
करमाळा-प्रतिनिधी
बुधवारी अचानक मध्यरात्री पर्यंत खंडीत झालेला वीजपुरवठा सुरुळीत करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या यशस्वी प्रयत्नांचे कौतुक शेतकरी कामगार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष दशरथआण्णा कांबळे यांनी केले आहे.
यावेळी ते असे ही म्हणाले कि, करमाळा शहरासह बुधवारी तालुक्यातील सुमारे ३५ गावातील वीजपुरवठा अचानक खंडीत झाला होता. सुरुवातीला सर्वांना खंडीत झालेला वीजपुरवठा नेहमीच्या आठवड्याच्या दिवशी झाला असेल असे वाटले. याच अनुषंगाने सदरची खंडीत झालेली वीज परत नेहमीच्या वेळेत येईल असे वाटले होते. परंतु वीज येण्याची वेळ जसजशी लांबत चालली, तशा विविध ठिकाणच्या नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या. परंतु हि सर्व परिस्थिती कशा प्रकारे सुधारता येईल? यासाठी महावितरणचे कर्मचारी विविध ठिकाणी जाऊन कोठे वीज पुरवठ्यात बिघाड झाला हे पाहत होते. सरतेशेवटी सदरच्या बिघाडाचे कारण समोर आले. ते म्हणजे देवीचा माळ येथे करमाळा-बार्शी रस्त्याच्या नुतनीकरणाचे काम सुरु आहे. त्याठिकाणी रस्ता खोदाईचे काम सुरु आहे. व त्याच ठिकाणच्या भुमिगत असलेल्या वायर जेसीबी मुळे उखडल्या होत्या. त्यामुळेच सदरचा संपुर्ण वीजपुरवठा खंडीत झाल्याचे निदर्शनास आले. व त्यानंतर तालुक्यातील कॉन्ट्रॕक्ट बेसवर व पर्मनंट असलेले सर्व भुमिपुत्र वायरमन एकत्रित येत, तसेच शहर अभियंता शिंदे साहेब व वाघमारे साहेब हे दोनच प्रमुख अधिकारी उपस्थित असताना, स्वतःच्या जीवावर उदार होऊन सदरचा वीजपुरवठा सुरुळीत व्हावा यासाठी रात्री उशिरा पर्यंत काम करुन वीज पुरवठा सुरुळीत केला. त्यामुळे ह्या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. असे उद़्गार दशरथआण्णा कांबळे यांनी काढले आहेत.
तर पुढे बोलताना कांबळे म्हणाले कि, या वीज महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामगिरीवर कौतुकाची थाप मिळणे गरजेचे असताना, काही राजकारणी येथे सुध्दा कर्मचाऱ्यांच्या निष्काळजी पणामुळेच सदरची सर्व परिस्थिती उद़्भवली असे म्हणत, त्यांच्या निलंबनाची मागणी करायला मागे सरले नाहीत. त्यामुळे राजकारण कशात करावे? आणि कशामुळे करावे? हे पाहणे सुद्धा आता गरजेचे बनले आहे. खरे तर रस्ता नुतनीकरणासाठी रस्त्याची खोदाई, व संबंधित ठेकेदाराने केलेल्या निष्काळजीपणावर बोट ठेवून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करणे गरजेचे होते. परंतु वड्याचे तेल वांग्यावर काढणे, चोर सोडून संन्याशाला मारणे हि तर आधीपासूनची राजकारणामध्ये रित पडत आलेली आहे. परंतु शेतकरी कामगार संघर्ष समिती वीज महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांचे कौतुक तर करत आहे. पण या सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभी आहे.