जात प्रमाणपत्र पडताळणीस मुदतवाढ मिळावी... आ.संजयमामा शिंदे यांची उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, ना.चंद्रकांत पाटील, ना.हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणी प्रतिनिधी हर्षवर्धन गाडे
जात प्रमाणपत्र पडताळणीस मुदतवाढ मिळावी...
आ.संजयमामा शिंदे यांची उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, ना.चंद्रकांत पाटील, ना.हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणी
प्रतिनिधी हर्षवर्धन गाडे
संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या कुणबी जात प्रमाणपत्र काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. करमाळा तालुक्यामध्ये जवळपास 20 हजार पेक्षा अधिक जात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले असून सध्या या सर्व प्रकरणांची जात प्रमाणपत्र पडताळणी होणे अद्याप बाकी आहे. जून मध्ये सर्वच महाविद्यालयांचे प्रवेश सुरू होत असून अनेक महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतानाच जात पडताळणी प्रमाणपत्र अत्यावश्यक केल्यामुळे करमाळा तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांपुढे मोठा यक्ष प्रश्न उभा राहिलेला आहे.
याबाबत करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे. याबाबत आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आमदार शिंदे यांनी याबाबत निवेदन दिलेले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सध्या निट (NEET) परीक्षेचा निकाल लागलेला असून सीईटी(CET) परीक्षेचा निकाल 10 जून 2024 रोजी लागणार असून दि.11 जून 2024 पासून वैद्यकीय ,इंजीनियरिंग व इतर महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे .
वास्तविक पाहता सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर कुणबी नोंदी आढळल्यामुळे कुणबी समाजाला ओबीसी(OBC) जात प्रमाणपत्र मिळालेले आहे ,परंतु त्याची जात प्रमाणपत्र पडताळणी अद्याप झालेली नाही. गेल्या 3 महिन्यापासून अनेक प्रकरणे जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सोलापूर कडे प्रलंबित आहेत.
11 जून पासून होणाऱ्या प्रवेशासाठी महाविद्यालयाकडून जात पडताळणी प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे .त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे .सदर विद्यार्थ्यांचे संभाव्य शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सर्व महाविद्यालयात प्रवेश प्रक्रियेवेळी जात प्रमाणपत्र पाहून प्रवेश प्रक्रिया करण्यात यावी व जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी 6 महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात यावा. याविषयी आपल्याकडून सर्वसंबंधितांना योग्य ते आदेश व्हावेत ही विनंती असे पत्र नामदार अजितदादा पवार यांना दिलेल्या असून या पत्राच्या प्रति वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनमुश्री तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांना देण्यात आलेल्या आहेत.
सरस्वती हायस्कूल संदर्भात ना. दीपक केसरकर यांना दिले पत्र...
सरस्वती हायस्कुल वरकुटे ता. करमाळा, जि. सोलापूर या शाळेस सरप्लस मधून शिक्षक उपलब्ध करुन देणे देण्यासंदर्भात आमदार संजय मामा शिंदे यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना पत्र दिले असून त्यामध्ये म्हटले आहे की, माझे करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघातील मौजे वरकुटे ता. करमाळा, जि. सोलापूर येथील सरस्वती हायस्कुल वरकुटे ता. करमाळा या ग्रामीण भागातील माध्यमिक शाळेत इयत्ता ८ वी. ते १० वी. (१०० टक्के अनुदानित) पर्यंतचे वर्ग सुरु असून या प्रशालेमध्ये ५ शिक्षक व ५ शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत होते. परंतू वयोमानानुसार ४ शिक्षक सेवानिवृत्त झालेले असल्याने शिक्षकाअभावी विद्यार्थी संख्या कमी होवून सदर शाळा बंद होण्याची शक्यता आहे.
तरी सदरची ग्रामीण भागातील शाळा सुरु राहण्यासाठी सरप्लस शिक्षकांमधून आवश्यक शिक्षकांची सरस्वती हायस्कुल वरकुटे ता. करमाळा येथे नियुक्ती करण्यात यावी.
सदर पत्रांच्या प्रति शिक्षण उपसंचालक, पुणे विभाग पुणे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. सोलापूर व मा. शिक्षणाधिकारी (माध्य.) जि.प. सोलापूर यांना देण्यात आल्या आहेत.