कुगावात पहिलीच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटणार सरपंच सुवर्णा पोरे
कुगावात पहिलीच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटणार सरपंच सुवर्णा पोरे यांची माहिती
चिकलठाणा : कुगाव ता. करमाळा ग्रामपंचायत पहिलीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी शालेय साहित्याचे वाटप करणार आहे. सरपंच सुवर्णा पोरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पटसंख्या वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यावर चर्चा झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
कुगाव ग्रामपंचायतीची सभा नुकतीच झाली. इयत्ता पहिली मध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत शालेय साहित्य वाटप करण्यावर चर्चा झाली. हा उपक्रम राबविण्यात येणार आहे, असे प्रतिपादन कुगाव गावचे सरपंच सुवर्णा महादेव पोरे यांनी केले.
जिल्हा परिषद शाळांकडे होत असलेले दुर्लक्ष , तसेच घटत असलेली विद्यार्थी संख्या या सर्व गोष्टी विचारात घेऊन हा उपक्रम राबविण्याचा निर्णय कुगाव ग्रामपंचायतच्या वतीने घेण्यात आला. या वेळी कुगाव ग्रामपंचायत सरपंच सुवर्णा पोरे यांच्याबरोबरच उपसरपंच विजया गावडे, ग्रामपंचायत सदस्य मन्सूर सय्यद, कोमल अवघडे, अमृता कोकरे, सखुबाई अवघडे,मंगेश बोंद्रे, कौशल्या कामटे, प्रकाश डोंगरे, ग्रामपंचायत अधिकारी श्रीकांत बारकुंड, ग्रामपंचायत कर्मचारी महादेव बल्लाळ उपस्थित होते.
यावेळी सौ पोरे म्हणाल्या, गावाचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विविध विकासकामांबरोबरच आपली भावी पिढी सुदृढ कणखर करण्यासाठी त्यांच्यासाठी काही उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यांची सुरुवात आम्ही या उपक्रमाने करत आहोत. सर्व ग्रामस्थांची त्यासाठी साथ आहे. आमचे नेते आमदार नारायण पाटील, आदिनाथ कारखाना संचालक महादेव पोरे,आदींच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जाणार आहे.