वीट जिल्हा परिषद गट ताकदीने लढणार – गणेश चिवटे
वीट जिल्हा परिषद गट ताकदीने लढणार – गणेश चिवटे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत नुकतीच जाहीर झाली आहे. या सोडतीत वीट जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असून या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी आपल्या सुविद्य पत्नी
सौ. अश्विनी गणेश चिवटे या वीट जिल्हा परिषद गटातून उमेदवार म्हणून निवडणूक ताकदीने लढवणार असल्याची घोषणा केली आहे. पत्रकारांशी बोलताना गणेश चिवटे म्हणाले की,“गेल्या काही दिवसांपासून आम्ही वीट जिल्हा परिषद गटात सातत्याने विकास कामे केली आहेत. गटातील गावागावात रस्ते, पाणीपुरवठा योजना, शाळा दुरुस्ती, आरोग्य सुविधा, महिला बचत गटांचे सक्षमीकरण आदी क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केली आहे. त्यामुळे आज जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.
पुढे बोलताना गणेश चिवटे म्हणाले की तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून लोकहिताची अनेक विकासकामे पूर्ण केली आहेत. यामध्ये विशेषतः वीट जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये मागील वर्षांत तब्बल 20 ते 25 कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लागली आहेत.
आमचा उद्देश केवळ सत्ता मिळवणे नसून, वीट गटाचा संपूर्ण विकास, महिला सक्षमीकरण आणि युवकांना संधी उपलब्ध करून देणे हा आहे. भारतीय जनता पक्षाचे धोरण म्हणजे ‘सबका साथ, सबका विकास’ आणि आम्ही त्याच तत्वावर काम करत आहोत. याच विश्वासावर आम्ही या निवडणुकीत उतरत आहोत.”सदर विट जिल्हा परिषद गट महिलेसाठी आरक्षित झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, राजकीय वर्तुळात असे मानले जाते की, गणेश चिवटे यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर वीट गटात भाजपची पकड अधिक मजबूत झाली आहे. त्यामुळे या गटात होणारी निवडणूक चुरशीची असली तरी चिवटे यांच्या नेतृत्वाखालील संघटना सज्ज असल्याचे चित्र दिसत आहे.वीट जिल्हा परिषद गटात चिवटे कुटुंबाच्या या घोषणेमुळे स्थानिक राजकारणाला नवी दिशा आणि रंगत येण्याची चिन्हे आहेत. आगामी निवडणुकीत हा गट जिल्ह्यातील सर्वाधिक लक्षवेधी ठरणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.