केम-ढवळस रस्त्यावर कारपेटची मागणी; रस्ता दुरुस्त न झाल्यास प्रहार स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा प्रहार तालुका अध्यक्ष संदीप तळेकर
केम-ढवळस रस्त्यावर कारपेटची मागणी; रस्ता दुरुस्त न झाल्यास प्रहार स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा प्रहार तालुका अध्यक्ष संदीप तळेकर
केम: (प्रतिनिधी)
तालुक्यातील केम ते ढवळस हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता अतिवृष्टीमुळे पूर्णपणे खराब झाला असून, जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे या मार्गावरून वाहतूक करणे अत्यंत जिकिरीचे झाले आहे. गतवर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असून, हा रस्ता आता अपघातांना आमंत्रण देत आहे.
हा रस्ता परिसरातील शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि व्यापारी यांच्यासाठी कुर्दुवाडीला जाण्यासाठीचा मुख्य आणि महत्त्वाचा मार्ग आहे. रस्त्यावरील खड्डे चुकवताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे प्रवासाला जास्त वेळ लागत असून, नागरिकांचे शारीरिक आणि आर्थिक नुकसान होत आहे.
सदर रस्ता परिसरातील शेतकरी वर्गासाठी विशेषतः महत्त्वाचा आहे. शेतमाल बाजारात घेऊन जाण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी याच मार्गाचा वापर करावा लागतो. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीची भीती व्यक्त होत आहे.
या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. याबाबत प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष संदीप तळेकर यांनी प्रशासनाला निवेदन देऊन, तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. लवकरात लवकर सदर रस्त्यावर कारपेट (डांबरीकरण) टाकण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास, प्रहार स्टाईलने तीव्र आणि आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा प्रहार तालुका अध्यक्ष संदीप तळेकर यांनी दिला आहे. नागरिकांचे हाल थांबविण्यासाठी प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.