डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमास अनुपस्थित राहणाऱ्या पारेवाडीच्या सरपंच व उपसरपंचावर कारवाईसाठी नागेश कांबळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमास अनुपस्थित राहणाऱ्या पारेवाडीच्या सरपंच व उपसरपंचावर कारवाईसाठी नागेश कांबळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…
शुक्रवारी आंदोलन करण्याचा दिला इशारा…
करमाळा, प्रतिनिधी - तालुक्यातील पारेवाडी ग्रामपंचायतीत दि. १४ एप्रिल २०२५ रोजी घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमास पारेवाडी गावच्या सरपंच सौ. वंदना हनुमंत नवले व उपसरपंच गणेश नवनाथ खोटे हे अनुपस्थित होते. याबाबत करमाळा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार करून १५ दिवस उलटले तरी कारवाई केली जात नसल्याने रिपाई (आठवले गट) चे प. महा. संघटक नागेश कांबळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
यावेळी कांबळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि.१४ एप्रिल २०२५ रोजी पारेवाडी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमास पारेवाडी गावचे सरपंच सौ. वंदना हनुमंत नवले व उपसरपंच गणेश नवनाथ खोटे यांनी अनुपस्थित राहून कर्तव्यात कसूर केल्याबाबत पारेवाडी गावचे रहिवासी राजेंद्र केशव गरुड यांनी दि.१५/४/२०२५ रोजी गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. या तक्रारीवरुन विस्तार अधिकारी सदाशिव थोरात यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मात्र तक्रार करून १५ दिवस झाल्यानंतरही अदयापपर्यंत चौकशी अहवाल तयार करण्यात आलेला नाही. त्यामुळे सरपंच, उपसरपंचासह चौकशी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी कांबळे यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.
या प्रकरणातील दोषींवर लवकरात लवकर कारवाई न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्यावतीने शुक्रवार दि. ०९/०५/२०२५ रोजी दु. १२.३० वा. पंचायत समिती कार्यालयासमोर "हलगी नाद" आंदोलन करण्याचा इशारा कांबळे यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे.
गतवर्षी देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी पारेवाडी ग्रामपंचायतीमध्ये त्यांना अभिवादन करण्यात आले नव्हते. रायगड जिल्हयातील वाळुसरे दत्तवाडीच्या सरपंचाने १४ एप्रिल रोजी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जयंती साजरी न करता १७ एप्रिल २०२५ रोजी साजरी केल्यानंतर त्याला बडतर्फ करण्यात आले. पारेवाडी प्रकरणी चौकशीतील दिरंगाईमुळे संशय निर्माण होत आहे. वारंवार जाणीवपूर्वक चूका करण्याचा प्रयत्न केला जातो काय, याचीही चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.
नागेश कांबळे, प.महा. संघटक, रिपाई (आठवले गट)