पूर्व सोगाव रस्त्याच्या कामात अनियमितता: ग्रामस्थांचा १५ ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा
पूर्व सोगाव रस्त्याच्या कामात अनियमितता: ग्रामस्थांचा १५ ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा
करमाळा तालुका पूर्व सोगाव येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या कामाची गुणवत्ता सुधारली नाही, तर येत्या स्वातंत्र्यदिनी, म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी, सामूहिक आत्मदहन करण्याचा गंभीर इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.गेल्या काही दिवसांपासून पूर्व सोगाव ते उमरड या रस्त्याचे काम सुरू आहे. दोन गावांना जोडणाऱ्या या रस्त्यावर जवळपास दहा वस्त्या असुन उमरड येथील शेतकऱ्यांना उजनीकाठी शेतीपंपाची देखभाल करण्यासाठी याच रस्त्यावरुन जावे लागते. तसेच पुर्व सोगाव येथील नागरिक, विद्यार्थी, रुग्ण, शेतमजूर यांना तालूका अथवा शेजारच्या गावी जाण्यासाठी हाच एकमेव पर्याय आहे. यामुळे हा रस्ता चांगला व भक्कम होणे अत्यंत गरजेचे आहे. अनेक वर्ष दळणवळणाची समस्या आता सुटत असल्याने संपुर्ण सोगाव ग्रामस्थांनी या कामात लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. पण सर्वांचा अपेक्षाभंग होताना दिसुन येत असुन ठेकेदार व अधिकारी यांची मुजोरी जाणवत आहे.
अगदी कामास सुरुवात झाल्यानंतर या कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. "रस्त्यासाठी वापरण्यात येणारा मुरूम आणि डांबर अत्यंत हलक्या प्रतीचे आहे. डांबरीकरण करताना योग्य प्रमाणात उष्णता दिली जात नाहीये, ज्यामुळे रस्ता लगेच उखडण्याची शक्यता आहे," असे एका ग्रामस्थाने सांगितले.ग्रामस्थांनी यापूर्वी अनेकदा संबंधित ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे कामाच्या दर्जाबाबत तक्रारी केल्या आहेत. परंतु, या तक्रारींकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले असून, कामाचा दर्जा सुधारण्यासाठी कोणतीही ठोस पाऊले उचलली गेली नाहीत, असा ग्रामस्थांचा आरोप आहे.
या अनास्थेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आता थेट आत्मदहनाचा पवित्रा घेतला आहे. "आम्ही अनेकदा विनंत्या केल्या, निवेदने दिली, पण कोणीही ऐकून घेतले नाही. आता आमच्याकडे हाच एक पर्याय उरला आहे," असे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले. १५ ऑगस्टपर्यंत कामाचा दर्जा सुधारला नाही, तर मोठ्या संख्येने ग्रामस्थ एकत्र येऊन आत्मदहन करतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.
या गंभीर इशाऱ्यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन ग्रामस्थांच्या मागण्यांची दखल घ्यावी आणि रस्त्याचे काम दर्जेदार होईल याची खात्री करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा, स्वातंत्र्यदिनी एक अप्रिय घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे. या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने या विरोधात नेमिनाथ तात्या सरडे,धनंजय सरडे, धनंजय गोडगे सतीश सरडे तानाजी सरडे विठ्ठल बळीरामगोडगे उपसरपंच,ज्ञानेश्वर गोडगे,गोवर्धन गोडगे, नंदकिशोर सरडे,राहुल गोडगे, बाळासाहेब सरडे, अक्षय राखुंडे अक्षय मुळे, प्रवीण सरडे पृथ्वीराज सरडे, शंकर नांगरे,, कार्तिक सरडे ,स्वप्नील पडवळे आदिंनी आवाज उठवला आहे.