जिजाऊ जयंतीनिमित्त प्रा. रामदास झोळ यांना “मराठा शिक्षण भूषण पुरस्कार” प्रदान

जिजाऊ जयंतीनिमित्त प्रा. रामदास झोळ यांना “मराठा शिक्षण भूषण पुरस्कार” प्रदान

    मातृतीर्थ सिंधखेड राजा येथे राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघाच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या पावन भूमीत पार पडलेल्या जिजाऊ जयंती सोहळ्यात यावर्षीचा प्रतिष्ठेचा “मराठा शिक्षण भूषण पुरस्कार” दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
    प्रा. रामदास झोळ सर यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले दीर्घकालीन, सातत्यपूर्ण व बहुआयामी कार्य लक्षात घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, मूल्यशिक्षण यांसाठी सातत्याने कार्यशाळा व उपक्रमांचे आयोजन केले.

     पालकांमध्ये शिक्षणाविषयी जागृती निर्माण करणे, शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबिरे, मार्गदर्शन कार्यशाळा, आधुनिक अध्यापन पद्धतींचा अवलंब यावरही प्रा. झोळ सर यांनी विशेष भर दिला. शिक्षक हे समाजनिर्मितीचे शिल्पकार आहेत या भूमिकेतून शिक्षकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक विकासासाठी त्यांनी अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविले.

     शासनाच्या विविध शैक्षणिक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करणे, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार उपक्रम राबविणे, तसेच विविध शासकीय योजना, सवलती व शिष्यवृत्ती यांची माहिती तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी विशेष यंत्रणा उभारली. हजारो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, फ्री-शिप, ईबीसी, अल्पसंख्याक व इतर मागासवर्गीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात त्यांचे योगदान मोलाचे ठरले आहे.

     मराठा सेवा संघाच्या वतीने देण्यात येणारा “मराठा शिक्षण भूषण पुरस्कार” हा शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दिला जाणारा मानाचा पुरस्कार आहे. जिजाऊ जयंतीच्या पावनदिनी मातृतीर्थ सिंधखेड राजा येथे हा सन्मान मिळणे ही प्रा. झोळ सर यांच्यासाठी विशेष गौरवाची बाब ठरली.

    पुरस्कार स्वीकारताना प्रा. रामदास झोळ सर यांनी, “राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे विचार, त्याग आणि राष्ट्रनिर्मितीचे कार्य आजच्या शिक्षण व्यवस्थेसाठी दीपस्तंभ आहेत. विद्यार्थ्यांना केवळ पदवीधर नव्हे तर सुसंस्कृत, संवेदनशील व जबाबदार नागरिक घडवणे हेच आमचे ध्येय आहे,” असे मनोगत व्यक्त केले. हा पुरस्कार दत्तकला शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व पालकांना समर्पित करत त्यांनी सर्वांचे आभार मानले.

     या कार्यक्रमास मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, शिक्षक मतदार संघाचे आमदार किरण सरनाईक,चिखली विधानसभा मतदार संघाच्या माजी आमदार रेखाताई खेडेकर,कैलास काटकर तसेच मराठा सेवा संघाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, मान्यवर पाहुणे, शिक्षक, विद्यार्थी तसेच जिजाऊ भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त भक्तिमय व प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते.

    या पुरस्कारामुळे दत्तकला शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक कार्याचा गौरव झाला असून शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांसाठी हा सन्मान प्रेरणादायी ठरला आहे.


इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

रश्मी बागल यांच्या नावाची जोरदार चर्चा

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश

केम जिल्हा परिषद गट: भाजपच्या निष्ठवान कार्यकर्त्यांना संधी द्या; सुरेखा संतोष देवकर यांच्या उमेदवारीची मागणी