उत्तरेश्वर महाराजांच्या जत्रेला उरले अवघे काही दिवस; रस्त्यांची चाळण, सार्वजनिक बांधकाम विभाग सुस्तच!
उत्तरेश्वर महाराजांच्या जत्रेला उरले अवघे काही दिवस; रस्त्यांची चाळण, सार्वजनिक बांधकाम विभाग सुस्तच!
करमाळा: (प्रतिनिधी)
करमाळा तालुका केम येत्या १८ तारखेला केम ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर महाराज यांची मोठी जत्रा भरत आहे. या यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. मात्र, शहराकडे येणाऱ्या मुख्य रस्त्यांची सध्या मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे भाविकांचे आणि स्थानिकांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सध्या या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून रस्ते पूर्णपणे उखडले आहेत. जत्रेच्या पार्श्वभूमीवर या रस्त्यांची डागडुजी होणे अपेक्षित होते, परंतु अद्यापही बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून, अपघाताची टांगती तलवार भाविकांवर आहे. तसेच रस्त्यावरील धुळीमुळे पादचारी आणि दुचाकीस्वारांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
१८ तारखेला जत्रा असल्याने प्रशासनाने युद्धपातळीवर काम करणे गरजेचे होते. दरवर्षी जत्रेच्या नावाखाली केवळ थातुरमातुर मलमपट्टी केली जाते, असा आरोप नागरिक करत आहेत. "भाविकांच्या सोयीसाठी रस्ते गुळगुळीत हवेत की त्यांनी खड्ड्यातून वाट काढत देवाचे दर्शन घ्यायचे?" असा संतप्त सवाल भाविक विचारत आहेत.
जत्रेला अवघे काही दिवस शिल्लक असतानाही बांधकाम विभाग गाढ झोपेत असल्याचे चित्र आहे. जर वेळेत रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही, तर जत्रेच्या काळात मोठी वाहतूक कोंडी आणि अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तात्काळ लक्ष देऊन रस्ते दुरुस्त करावेत, अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे