झेडपी मेंबर होण्यासाठी अनेक इच्छुक कर्जबाजारी.. सावकाराकडून टक्केवारीने काढलेले कर्ज डोक्यावर. झेडपी निवडणूकीत उमेदवारांचा कोट,दीड कोटींचा खर्च.
झेडपी मेंबर होण्यासाठी अनेक इच्छुक कर्जबाजारी.. सावकाराकडून टक्केवारीने काढलेले कर्ज डोक्यावर. झेडपी निवडणूकीत उमेदवारांचा कोट,दीड कोटींचा खर्च.
करमाळा : मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या निवडणुक लढवून जिंकण्यासाठी करमाळा तालुक्यात अनेक हौशी उमेदवारांनी खाजगी सावकाराकडे एकर,दोन एकर जमीन गहाण ठेऊन लाखो रूपये टक्केवारीने घेऊन निवडणूक लढवल्याचे अनेक रंजक किस्से निवडणुक निकाला नंतर चविष्टपणे चर्चिले जात आहेत. राजकारणातून सत्तेची नशा एकदा चढली की काही खरे नाही मग कोण काय करेल याचा नेम नाही.झेडपी मेंबर होण्यासाठी कुणी ५० लाख,कुणी २५ लाख तर कुणी १० लाख रुपये खाजगी सावकाराकडून पाच ते तीन टक्के ने घेऊन निवडणुक रिंगणात उतरले. तर अनेकांनी तालुका पंचायतीवर मेंबर होण्यासाठी एकर,दोन एकर जमीन खाजगी सावकाराकडे गहाण ठेवून निवडणूकीसाठी लाखो रूपयांचा निधी उभा करुन निवडणुक यंत्रणा, कार्यकर्ते व मतदारावर खर्च केले आहेत. ऊस बागायत भागात राजकारणाचे भलतेच वेढ दिसुन येते. एका कार्यकर्त्याने बायकोला निवडणूक रिंगणात उभे करून निवडणूक खर्चासाठी बारामती च्या साखर कारखान्याकडे गाळपासाठी शेतात उभ्या ऊसाचा करार करून दहा लाख रूपये आणले व निवडणूकीत खर्च केले. एका बहाद्दर इच्छुकाने तर सासरवाडीत जाऊन बायकोला पुढे करून सास-याकडे आग्रह धरून कारखान्याच्या ऊस बीलाचे आलेले तीन लाख रूपये निवडणूकीत खर्च करून टाकले. तरी ही पराभव नशीबी आल्याने पश्चातापाची वेळ आली आहे. चौकट घेणे... ग्रामीण भागातील निवडणूकीत रंगीत, संगीत पार्ट्या,जेवनावळी, मतदारांना लक्ष्मी दर्शन करण्याची प्रथा आता सर्वश्रुत व रूढ झाली आहे. त्याशिवाय कार्यकर्ते व उमेदवारांना निवडणूक लढविल्यासारखे वाटतच नाही. आणि मग त्यात हौसे,नवसे व गौसे कार्यकर्ते तुम्हीच निवडून येणार आहात पण खर्च करा असा सल्ला देतात. मग हौशी इच्छुक उमेदवार सावकाराकडून टक्केवारीने लाखो रूपये कर्जाऊ घेऊन निवडणूक लढवतात व सावकारा कडून घेतलेल्या कर्जाची व्याजासह रक्कम परतफेड करताना उमेदवारावर पश्चात्ताप करण्याची वेळ येते.