केम–कंदर मार्गाची दयनीय अवस्था; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त

केम–कंदर मार्गाची दयनीय अवस्था; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त

करमाळा हर्षवर्धन गाडे

 तालुक्यातील केम ते कंदर या सुमारे १५ किलोमीटर लांबीच्या महत्त्वाच्या जोडरस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, या मार्गावरून प्रवास करणे वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. स्थानिक नागरिकांकडून प्रशासनावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्याची कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. पावसामुळे रस्त्यावरील खडी पूर्णपणे उघडी पडली असून अनेक ठिकाणी खोल खड्डे निर्माण झाले आहेत. दुचाकीस्वारांना या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दररोज छोटे-मोठे अपघात घडत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी प्रवास करताना चालकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे.
केम आणि कंदर परिसरातील गावांसाठी हा रस्ता मुख्य दळणवळणाचा मार्ग आहे. मात्र, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे रुग्णवाहिका वेळेत पोहोचणे कठीण झाले आहे. शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांना या खराब रस्त्याचा मोठा फटका बसत आहे. याशिवाय, वाहनांचे नुकसान होत असल्याने वाहनधारकांना आर्थिक भारही सहन करावा लागत आहे.
रस्त्याच्या या गंभीर समस्येबाबत वारंवार तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष बांधकाम विभागाला आदेश देऊन केम - कंदर रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्यास सांगावे . अन्यथा रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

रश्मी बागल यांच्या नावाची जोरदार चर्चा

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश

केम जिल्हा परिषद गट: भाजपच्या निष्ठवान कार्यकर्त्यांना संधी द्या; सुरेखा संतोष देवकर यांच्या उमेदवारीची मागणी