सोलापूर भाजप जिल्हाध्यक्ष निवडीकडे लक्ष; गणेश चिवटे की रामदास झोळ सर? करमाळ्याला मिळणार का संधी?
सोलापूर भाजप जिल्हाध्यक्ष निवडीकडे लक्ष; गणेश चिवटे की रामदास झोळ सर? करमाळ्याला मिळणार का संधी?
करमाळा प्रतिनिधी हर्षवर्धन गाडे
भारतीय जनता पार्टीच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष 'बॅटिंग' कुणाच्या हाती जाणार याकडे लागले आहे. करमाळा तालुक्यातून या पदासाठी दोन मातब्बर नावे सध्या जोरात चर्चेत असून, गणेश चिवटे आणि रामदास झोळ सर यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे.
गेल्या काही काळापासून जिल्ह्याच्या राजकारणात करमाळा तालुक्याचे वजन वाढले आहे. पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि आगामी निवडणुकांचे समीकरण पाहता, यावेळी जिल्हाध्यक्षपदाची माळ करमाळा तालुक्याच्या गळ्यात पडणार का? अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे.
पक्षातील जुने जाणते कार्यकर्ते आणि संघटनात्मक कामाचा मोठा अनुभव असलेले गणेश चिवटे यांचे नाव आघाडीवर आहे. कार्यकर्त्यांशी असलेले थेट जाळे आणि आक्रमक कार्यशैली ही त्यांची जमेची बाजू मानली जाते.
रामदास झोळ सर यांनीही जिल्हाभर आपला दांडगा जनसंपर्क निर्माण केला आहे. त्यांच्याकडे असलेल्या राजकीय अनुभवामुळे आणि पक्षश्रेष्ठींशी असलेल्या निकटच्या संबंधांमुळे त्यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू आहे.
दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी आपापल्या परीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एका बाजूला चिवटे यांचा अनुभव आणि दुसऱ्या बाजूला झोळ सर यांची रणनीती, अशा कात्रीत पक्षश्रेष्ठी कोणाची निवड करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
जिल्हाध्यक्षपदाचा हा 'निकाल नेमका कुणाच्या बाजूने लागतो, याकडे सोलापूर जिल्ह्यासह करमाळा तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे