खाकी वर्दीतील माणुसकी! कडाक्याच्या उन्हात झाडे जगवण्यासाठी करमाळा पोलिसांची धडपड
खाकी वर्दीतील माणुसकी! कडाक्याच्या उन्हात झाडे जगवण्यासाठी करमाळा पोलिसांची धडपड
करमाळा प्रतिनिधी हर्षवर्धन गाडे
सध्या मे महिन्याचा कडाका वाढला असून निसर्ग होरपळून निघत आहे. अशा परिस्थितीत केवळ माणसांनाच नाही, तर मुक्या झाडांनाही पाण्याची नितांत गरज आहे. हेच ओळखून करमाळा पोलीस ठाण्यातील हवालदार बालाजी घोरपडे आणि हवालदार शेख यांनी कर्तव्यापलीकडे जाऊन झाडे वाचवण्यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांची सध्या संपूर्ण तालुक्यात चर्चा होत आहे.
पोलीस दलातील कामाचा ताण आणि उन्हाचा तडाखा असतानाही, या दोन कर्मचाऱ्यांनी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून 'स्पेशल ब्रेक' घेत पोलीस वसाहतीतील झाडांना पाणी देण्याचा विडा उचलला आहे. वाढत्या तापमानामुळे अनेक झाडे सुकू लागली होती, ही बाब लक्षात येताच घोरपडे आणि शेख यांनी पुढाकार घेतला.
केवळ औपचारिकता म्हणून नव्हे, तर झाडे जगलीच पाहिजेत या भावनेने त्यांनी झाडांना पाणी देण्यासाठी वेळ काढला आहे. भर उन्हात झाडांच्या मुळांना पाणी घालून त्यांना जीवदान देण्याचे काम हे दोन्ही हवालदार सातत्याने करत आहेत.
"पोलीस म्हणून आम्ही समाजाचे रक्षण करतोच, पण निसर्ग वाचवणे हे देखील आपले कर्तव्य आहे. ही झाडे जगली तरच आपल्याला सावली आणि ऑक्सिजन मिळेल."
खाकी वर्दीतील या कर्मचाऱ्यांच्या संवेदनशीलतेचे सर्वत्र स्वागत होत आहे. 'पोलीस फक्त गुन्हेगारांवरच जरब बसवत नाहीत, तर निसर्गाची जोपासना करण्यातही तितकेच तत्पर असतात', अशा प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.