केममध्ये नागरिक संघटना रेशन दुकान बिचितकर; धान्य येऊनही वाटप बंद, ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप!
केममध्ये नागरिक संघटना रेशन दुकान बिचितकर मनमानी; धान्य येऊनही वाटप बंद, ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप!
केम येथील रेशन दुकानात शासकीय धान्य येऊन पडून असले, तरी रेशन दुकानदाराच्या मनमानी आणि आडमुठ्या धोरणामुळे गरीब लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित राहावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. "दुकानात धान्य आहे, पण देणार नाही," अशीच काहीशी भूमिका येथील दुकानदाराने घेतल्याने संतप्त कार्डधारकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, प्रशासनाने यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शासनाकडून मिळणारे गरिबांचे हक्काचे रेशन धान्य केम येथील रेशन दुकानात वेळेवर आणून ठेवण्यात आले आहे. अनेक हातावर पोट असणारे मजूर, ज्येष्ठ नागरिक आणि महिला दररोज दुकानाचे हेलपाटे मारत आहेत. मात्र, "मशिन चालत नाही", "सर्व्हर डाऊन आहे" किंवा "वेळ नाही" अशी नवनवीन कारणे सांगून रेशन दुकानदार नागरिकांना माघारी पाठवत आहे.
ग्रामीण भागातील गोरगरीब जनता याच रेशनच्या धान्यावर आपले पोट भरते. परंतु, दुकानदाराच्या या मनमानी कारभारामुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. धान्य दुकानात पडून खराब होण्याची भीती असतानाही, ते वेळेत न वाटण्यामागे रेशन दुकानदाराचा नक्की काय हेतू आहे? असा संतप्त सवाल आता केममधील नागरिक विचारत आहेत. याबाबत विचारणा करायला गेल्यास नागरिकांना उद्धटपणे उत्तरे दिली जात असल्याच्याही तक्रारी आहेत